रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि त्यातही मृतांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबतची भीती वाढू लागली आहे. अशावेळी कोरोनाचे उपचार घेणार्या रुग्णांना आनंद मिळेल, असे विविध उपक्रम रुग्णालयांकडून हाती घेतले जात आहेत. खेड नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरनेही असाच उपक्रम राबवला. कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाची संगीताच्या तालावर रुग्णालयातून बिदाई करण्यात आली.खेड कोविड केअर सेंटरचे डॉ. विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम राबवला. एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जात होता. अशावेळी आपण अजून रुग्णालयातच असल्याच्या विचाराने इतर रुग्णांच्या मनावरचा ताण वाढतो. म्हणूनच डॉ. पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या कोरोनामुक्ताला निरोप देताना चक्क छोटेखानी कार्यक्रमच केला.
गाण्याच्या तालावर नृत्य करून या रुग्णाला निरोप देण्यात आला. टाळ्या वाजवत त्यात इतर रुग्णही सहभागी झाले. त्यामुळे वातावरण अतिशय हलकेफुलके होते. एका रुग्णाची ही बिदाई इतर रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी प्रोत्साहित करणारी होतीच, शिवाय ती वातावरणातील वातावरणातील ताण कमी करणारीही होती.