रत्नागिरी : साखरपा (ता. संगमेश्वर) येथे भाजी विक्रीसाठी आलेल्या पेठवडगाव (ता. हातकणंगले, कोल्हापूर) विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी ५:३० वाजेदरम्यान घडली. राजेंद्र तानाजी भोसले (वय ४८), असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकलेले नाही. देवरुख पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात घाटमाथ्यावरून विक्रेते मोठ्या प्रमाणात दाखल होतात. राजेंद्र भोसले आणि त्याचा मित्र प्रथमेश संजय जाधव (२७, रा. पेठवडगाव) हे दोघे पिकअप (एमएच ०९, एफएल ४८२८) गाडी घेऊन भाजी विक्रीसाठी आले होते. राजेंद्र भोसले सकाळी कोंडगाव बाजारपेठेतील शौचालयात प्रात:विधीसाठी गेले होते.
बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मित्र प्रथमेश याने त्यांच्यासोबत आलेला सहकारी अमर पाटील याला पाहण्यासाठी पाठविले. अमर पाटील याने तिथे जाऊन पाहिले असता राजेंद्र भोसले हे शौचालयाच्या दरवाजाबाहेर पडलेले दिसले. अमर पाटील याने लगेचच प्रथमेशला याबाबत माहिती दिली.त्यानंतर दोघांनीही त्यांना तत्काळ साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत असल्याचे घोषित केले. राजेंद्र भोसले यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुख पोलिस करीत आहेत.