अनिल कासारे --- लांजा -पदोपदी होणारा अपमान... समाजाकडून मिळणारी दुजाभावची वागणूक... ज्या आजारपणाच्या कालावधीत घरच्यांची गरज असते, त्याच काळात घरच्यांनी दूर लोटले, तर त्याचे जीवन जगताना होणारी ससेहोलपट आयुष्यात थांबता थांबत नाही, अशा दुष्टचक्रात सापडलेल्या सारीका हिची दुर्दैवी कहाणी ऐकल्यावर दगडालाही पाझर फुटेल. पण, यामागे कारण होते ते घाईगडबडीत घेतलेला निर्णय...सावित्री घाटमाथ्यावरील, तर तिचा नवरा कोकणातील असल्याने रोजीरोटीसाठी मुंबईत होता. सावित्री नवी नवरी होती. तिला एक प्रश्न मनाला नेहमीच सतावत होता. तो म्हणजे आपल्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचे नेमके निधन कशाने झाले. त्यावेळी तिला उत्तर मिळाले कॅन्सरने! पहिल्या बायकोची मुले मोठी होती. सासरी आल्यानंतर सावित्रीचे नाव सारीका ठेवण्यात आले होते. सारीकाला दोन वर्षांनी तिच्या संसाराच्या वेलीवर फूल उमलणार असल्याची जाणीव झाली. त्यानंतर डॉक्टरी सुरु झाली आणि एका डॉक्टरी रिपोर्टमध्ये धक्कादायक निदान झाले. तिला दुर्धर आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि ती कोलमडून पडली. आई होणे ही सारीकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बाब असताना तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिने नवऱ्याला याचा जाब विचारला. मात्र, हा आजार तुझ्यामुळेच मलादेखील होण्याची शक्यता आहे, अशी भीती उलट तिलाच दाखवण्यात आली. त्यानंतर नवऱ्याचाही तसाच अहवाल आला. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच कालावधीत पहिल्या पत्नीच्या मुलाने लग्नदेखील केले. त्याला मुंबई येथील खोलीत राहायचे असल्याने सारीकाला दुर्धर आजाराची लागण झाल्याचे त्याने चाळीत सांगून टाकले.चाळीतील प्रत्येकजण तिच्याशी दुजाभावाने वागू लागला. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आजूबाजूच्या लोकांच्या वागणुकीला सारीका वैतागून गेली. दोन वर्षांनी तिला पुन्हा दिवस गेल्याने डॉक्टरी सुरु झाली. त्याचवेळी नवऱ्याने तिला गावी पाठवून दिले. सासू-सासरे यांना तिच्या आजाराची माहिती असल्याने त्यांनीही तिचा छळ सुरू केला. त्यामुळे तिने सासर सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या मुलीला घेऊन ती पंढरपूर येथे वसतिगृहात गेली. आपली बायको गायब झाल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने पोलिसात दाखल केली होती. पोलीस तपासात सारीका पंढरपूर येथे असल्याचे समजताच नवरा गोड बोलून तिला मुंबईत घेऊन गेला. अकरा महिन्यांपूर्वी तिचे नवऱ्याबरोबर भांडण झाले आणि ती तडक घरातून निघाली. मात्र, बोरिवली येथून गावाकडे जाणाऱ्या रेल्वेबाबत तिला माहिती नसल्याने तीन दिवस तिने पैशांशिवाय स्टेशनवर काढले. त्यानंतर पैसे जमा झाल्यावर ती आपल्या गावच्या घरी आली. त्यावेळीदेखील तिला घरी घेतले गेले नाही. रत्नागिरीतील एक महिला निवासामध्ये सारीका भरती झाली. त्या ठिकाणी गेले ११ महिने तिने काढले. त्यामध्येच तिने दुसरी मुलगी स्नेहल हिला सहा महिन्यांपूर्वी जन्म दिला. पहिली मुलगी २ ते ३ वर्षांची, तर दुसरी मुलगी तान्हुली असल्याने तसेच आजारपणाला जोर मिळू नये म्हणून ती औषधे घेत होती. मात्र, औषधे घेतल्याने तिला झोप येत असे. त्यामुळे मुली रडल्या तरी तिला जाग येत नसल्याने येथील इतर महिलांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे येथील कर्मचारीवर्ग तिच्यावर ओरडत असे. त्यामुळे तिने हे निवास सोडण्याचा निर्णय घेतला.दिनांक ५ मार्च रोजी बावनदी येथे असताना तिने आपल्या दोन्ही मुलींसह औषध घेतले आणि सारेजण झोपी गेले. त्याचवेळी एक ट्रकचालक तेथे आला. त्याने तिची विचारपूस केली. तो चालक अजित जमादार होता. त्याने तुझ्या मुलांना व तुला सांभाळतो. मात्र, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असे आश्वासन दिले व ट्रकमध्ये बसवून आंजणारी येथे आणले.अजित जमादार हा ट्रक चालक असल्याने तो बाहेर जात असे. त्यावेळी बाजूच्या रुममध्ये असणारी पूजा ही माझ्या मुलीला घेऊन खेळवत व काम आटोपल्यावर बोलायला येत असे. त्यावेळी पूजाची मावशी संगीता हिने तुझी मुलगी माझ्या भाचीला दे, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर दिनांक २३ रोजी सहा महिन्यांच्या तान्हुल्या स्नेहल हिचे तिने अपहरण केले. त्यावेळी मी सारीका अजित जमादार असे नाव सांगितले. कारण माझा पूर्वीचा इतिहास लपवायचा होता. मात्र, नियतीच्या मनामध्ये जे होते, तेच घडले आहे. जीवनामध्ये असलेल्या आजाराने माझ्यावर मोठा आघात होऊन समाजात मी सर्वसामान्य माणसासारखे जगू शकत नाही, हीच भावना तिच्या मनाला सारखी टोचत आहे.
एका दुर्धर आजाराने ‘तिच्या’ आयुष्याचा मार्गच बदलला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2016 11:33 PM