वैभववाडी : राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे करुळ घाटात उसाचा ट्रक उलटला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सायंकाळी ५ वाजल्यापासून ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, रस्त्यावर पडलेला उसाचा ढिगारा आणि अपघातग्रस्त ट्रक जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी उशिरा या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली.वैभववाडीतून असळज (ता. गगनबावडा) कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक करुळ घाटातील वळणावर उलटला. उलटलेला ट्रक आणि त्यातील उसाने बहुतांशी रस्ता व्यापल्यामुळे वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे करुळ घाटरस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.अपघाताची माहिती मिळताच करुळ तपासणी नाक्यावर असलेले पोलिस हवालदार शैलेश कांबळे आणि पाटील हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ही माहिती वैभववाडी पोलिस स्थानकात कळविल्यानंतर वैभववाडीहून वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली तर गगनबावड्यात अडकलेली वाहनेदेखील भुईबावडामार्गे वळविण्यात आली.अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावर असलेला ऊस जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले होते. बहुतांशी ऊस बाजूला करण्यात यश आले. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू होते.अपघात रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच!करुळ घाटरस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे आधीच बहुतांश वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आलेली आहे. या घाटरस्त्यातील वळणावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमध्ये अवजड वाहने जातात. त्यामुळे ती एका बाजूला कलंडण्याची शक्यता अधिक आहे. हा अपघातही ट्रक खड्ड्यात कलंडल्यामुळेच झाल्याचे वाहन चालकांनी सांगितले.
करुळ घाटात उसाचा ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच अपघात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:53 AM