रत्नागिरी : भारत संचार निगमचे (बीएसएनएल) रत्नागिरी विभागीय महाप्रबंधक सुहास गोपाळ कांबळे (वय ५३, मूळ गाव दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांना दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी अटक केली आहे. कांबळे यांच्या अटकेनंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तेची तपासणी सुरू झाली आहे. सांगली येथील घरासह अन्य मालमत्तेची झाडाझडती घेऊन काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सांगली येथे आणखी काही मालमत्ता आहे का, याचा शोध सीबीआयचे दुसरे पथक घेत आहे. शनिवारी दिवसभर रत्नागिरी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रियाही सीबीआयने सुरू केली आहे. गेले दीड वर्षे सुहास कांबळे रत्नागिरीचे महाप्रबंधक आहेत. या कालावधीत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. बीएसएनएलची सर्वच कामे कंत्राट पद्धतीने करण्यात येतात. कोट्यवधी रुपयांची बिले घेताना त्यांनी ठेकेदारांकडून यापूर्वी लाच घेतली आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. त्यातून स्थावर, जंगम मालमत्ता गोळा केली आहे का? ती कोठे, कोठे आहे, याचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. कांबळे हे दत्तवाड येथील राहणारे असले तरी त्यांच्या सांगली, रत्नागिरी येथेही मालमत्ता आहेत. त्या मालमत्ताबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या सांगलीतील निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर तेथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सांगली शहरात त्यांची किती मालमत्ता आहे याचा शोध सीबीआयचे दुसरे पथक घेत आहे. संपूर्ण सेवाकाळातील केलेल्या कामाचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी सेवा बजावली आहे, तेथेही सीबीआयकडून तपास केला जात आहे. त्यांनी गोळा केलेल्या सर्व मालमत्तेवर टाच आणण्याची कार्यवाही सीबीआयने सुरू केली आहे. रत्नागिरी शहर व परिसरात त्यांनी फ्लॅट, जागा घेतली आहे का? याचा शोधही सुरू होता. त्यांची दि. २९ मार्चपर्यंत चौकशी करून मालमत्ता सील केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
सुहास कांबळे यांच्या मालमत्तेवर येणार टाच?
By admin | Published: March 27, 2016 1:06 AM