राजापूर : तालुक्यातील गोठणेदोनिवडेमधील नेरकेवाडी येथील सोनाली शरद पुजारी (१७) हिने बुधवारी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत निश्चित कारण कळू शकले नव्हते. बुधवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान ही घटना घडली.
याबाबत दत्ताराम अनंत पुजारी यांनी राजापूर पोलीस स्थानकात माहिती दिली. या आत्महत्येप्रकरणी सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. एस. वेंगुलेकर अधिक तपास करीत आहेत. मृत सोनालीच्या शवविच्छेदन कुणी करायचे त्यावरून ओणी व फुफेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आपली जबाबदारी झटकताना एकमेकांकडे बोटे दाखविल्याने गुरुवारी दुपारपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. रत्नागिरीच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या राजापुरात आल्या असता काहींनी त्यांचे या विषयावर लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशीही संपर्क साधला. अखेर दुपारनंतर मृतदेहाचे विच्छेदन होऊन नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.