सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा समाज मंदिर परिसरात राहणाऱ्या मोनिका अशोक कांबळे (२६) या युवतीने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याची संधी साधत तिने हा प्रकार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.येथील समाज मंदिर परिसरात मोनिका ही आई, वडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत रहायची. वडील अशोक कांबळे हे येथील नगरपालिकेत कामाला आहेत. ते रविवारी सकाळी कामावर गेले होते. तर तिची आई व भाऊ वेंगुर्ले येथे डॉक्टरकडे गेले होते. या दरम्यान मोनिका घरात एकटीच होती. हीच संधी साधत छपराच्या वाशाला गळफास घेत तिने आत्महत्या केली.मोनिका हिचे शिक्षण पंधरावीपर्यंत झाले होते. ती शहरातील सर्वोदयनगर येथे खासगी कामासही जात होती. आज रविवार होता. त्यामुळे ती कामास गेली नव्हती. सकाळी आईला भावासोबत डॉक्टरकडे जाण्यास सांगितले, तर वहिनीला कोलगाव येथे पाठवून दिले आणि तिने आत्महत्या केली.काही काम असल्याने आईने घरी मुलीला फोन केला, पण ती फोन उचलत नव्हती. बराच वेळ आई फोन करीत होती, पण ती उचलत नसल्याने अखेर आईने शेजाऱ्यांना मोनिका घरी आहे का ते बघण्यास सांगितले. तेव्हा शेजारी खातरजमा करण्यास गेले असता त्यांना मोनिका गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तिने मोनिकाची आई व भावाला माहिती दिली. त्यानंतर ते सावंतवाडीत दाखल झाले.
याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीसही घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घरी दाखल झाले. यात उपनिरीक्षक अरुण सावंत, हवालदार शरद लोहकरे, धनंजय नाईक, स्वाती मुळीक यांचा समावेश होता.त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तेथे विच्छेदन करून मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी अचानक घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मोनिकाच्या आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.