देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर सप्रेवाडी येथील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश दत्ताराम शिंदे असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी, २८ जुलै रोजी रात्री घडली.
देवरूख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मंगेशने बुधवारी घरातील पडवीमधील लोखंडी अँगलला इलेक्ट्रिक सर्व्हिस वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. ही बाब घरातील मंडळींच्या निदर्शनास येताच मंगेशला उपचारासाठी धामापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती.
त्याचे वडील दत्ताराम शिंदे यांनी देवरुख पोलीस स्थानकात याबाबत खबर दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल जावेद तडवी, सचिन भुजबळराव, सचिन पवार, संदीप जाधव, विश्वास बरगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. या घटनेची नोंद बुधवारी रात्री १० वाजता देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करीत आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.