देवरुख : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून देवरुख क्रांतिनगर येथील २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २०) सायंकाळी घडली. सुमेधा नामदेव प्रसादे असे या तरुणीचे नाव आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे वडील नामदेव प्रसादे यांनी पोलिसांना ही माहिती दिली. सुमेधा वाणिज्य शाखेची पदवीधर होती. नोकरीसाठी ती सतत प्रयत्न करत होती. मात्र तरीही नोकरी मिळत नसल्याच्या तणावात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे नामदेव प्रसादे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
हा प्रकार घरच्या मंडळींच्या लक्षात येताच तिला तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर करीत आहेत.