रत्नागिरी : केवळ दोन वर्षात कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ठसा उमटविलेले जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.प्रदीप पी. यांनी १२ मे २०१६ रोजी रत्नागिरीचा पदभार स्वीकारला होता. नंदूरबारप्रमाणेच त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार आदी कामांना गती दिली. लोकशाही दिनाच्या फोन इन तक्रारी दाखल करण्याचा पहिला प्रयोग सुरू केला. त्याचप्रमाणे २४ तास कार्यरत मदत कक्षाद्वारे नागरिकांच्या थेट तक्रारी स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी केला.
नाणार प्रकल्पाचा विषयही त्यांनी उत्तम प्रकारे हाताळला आहे. मात्र, उण्या-पुऱ्या दोन वर्षांच्या आतच त्यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे मूळ गाव आष्टी (जिल्हा बीड), असून त्यांनी आतापर्यंत विविध पदभार सांभाळला आहे.