चिपळूण : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार गट आणि मित्र पक्षाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनिल तटकरे हे खेड तालुक्यातील लोटे येथे एका बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी आले होते. यावेळी त्यांना शरद पवार गटाचे नेते, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याचे कळतात सुनिल तटकरे यांनी आपला दौरा तातडीने आटोपून त्यांच्या जयेश निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता जाऊन तब्बेतीची चौकशी केली.खासदार सुनिल तटकरे आणि रमेश कदम यांची मैत्री सुपरिचित आहे. सुनिल तटकरे यांना कदम यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याचे समजले. तातडीने त्यांनी खेडनंतर असलेला पूर्वनियोजित दौरा रद्द करून तातडीने चिपळूणला धाव घेतली. जयेश निवासस्थानी ते दाखल झाले. रमेश कदम यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या दोन नेत्यांमध्ये केवळ दहा मिनिटं भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आदी मोजकीच मंडळी उपस्थित होते. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन गटातील नेत्यांमध्ये नेमकी राजकीय चर्चा या वेळी काय झाली, याचा फारसा तपशील समजू शकला नाही, परंतु मी ज्या पक्षात असतो, तेथे प्रामाणिकपणे काम करतो, असे रमेश कदम यांनी खासदार सुनिल तटकरे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन नेत्यांमधील हे भेट सायंकाळी चर्चेचा विषय ठरली होती.
सुनील तटकरेंनी घेतली शरद पवार गटाचे नेते रमेश कदमांची भेट
By संदीप बांद्रे | Published: April 02, 2024 7:24 PM