रत्नागिरी : भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी नगर वाचनालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी लाड हे जिल्हा दौऱ्यावर आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते बडे मासे भाजपच्या गळाला लागले आहेत, असा सवाल पत्रकारांनी केला असता लाड म्हणाले, जिल्ह्यात एक दोनजणच बडे मासे आहेत. ते संपर्कात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आता बुडते जहाज बनले आहे. त्यामुळे हे जहाज बुडायच्या आधी ते वाचण्यासाठी अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यात भाजपची स्थिती आता भक्कम आहे, असे ते म्हणाले.राज्यात विधानसभेला युती झाली नाही तर तुम्ही रत्नागिरीतून लढणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर आपण असे झाल्यास रत्नागिरीतून निवडणूक नक्की लढवू, असेही सांगितले होते.
रत्नागिरीतच काय परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. त्यामुळे तेथे भाजपचा कोणताही कार्यकर्ता युती झाली नाही तर निवडणूक लढवून विजयी होऊ शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, हा जर-तरचा विषय आहे. परंतु, राज्यात शिवसेना व भाजपची युती होणार व फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार हे शंभर टक्के सत्य असल्याचे लाड म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त स्थितीची पाहणी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनाला आल्याचे लाड म्हणाले. संगमेश्वरसह अन्य भागांमध्येही अनेक ठिकाणी नद्या व अन्य जलस्रोत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे.
लोकसहभागातून हा गाळ काढणे शक्य आहे. लोकांचीही त्यासाठी तयारी असल्याचे आपल्याला आढळून आले. त्यामुळे गाळउपसा आवश्यक असलेल्या नद्यांच्या परिसरातील गावांच्या समन्वयातून त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन लोकसहभाग घेतला जाणार आहे.राज्यात ७० हजार नव्हे तर ९० हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे. मध्यंतरी काही कायदेशीर बाबींमुळे हे मेगाभरती थांबली होती. मात्र, येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शासकीय भरतीत कोकणातील उमेदवारांना १० ते १५ टक्केच स्थान मिळते याबाबत पत्रकारांनी विचारताच यापुढे होणाऱ्या भरतीत स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले.राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसचआगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे असतील की शिवसेनेचे यावरून जोरदार कलगी-तुरा सुरू आहे. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री कोण होणार, असा सवाल पत्रकारांनी केला असता लाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री असतील. त्याबाबत कोणीही संशय ठेवू नये.
मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहील. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याप्रमाणे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद येऊ शकेल. मात्र, हे वरिष्ठ स्तरावरील विषय आहेत, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.