चिपळूण : लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी भाजप व त्यानंतर सेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा मातोश्रीवर घिरट्याही मारल्या. शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी ते खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला.गुहागर व चिपळूण मतदारसंघाच्या सीमेवर असलेल्या कोंढे येथील रिगल महाविद्यालयाच्या सभागृहात भास्कर जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेतर्फे गुरूवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली.ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे खासदार तटकरे यांनी आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अंतिम स्वरूपातील चर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी केली होती. त्या भेटीतील शब्दन्शब्द आपल्याला माहीत असल्याचेही गीते यांनी यावेळी सांगितले.गीते यांनी पुढे सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आमच्या पक्षात डागी माणसे घेत नाहीत, असे सुनावले होते. त्यानंतर ते मातोेश्रीवर घिरट्या मारत होते. शेवटपर्यंत त्यांना मातोश्रीत प्रवेश मिळाला नाही.
अखेरच्या क्षणी त्यांनी आपली कन्या आदिती तटकरे हिच्यासाठी शिवससेनेकडे तिकीट मागितले होते. मला नाहीतर तिलातरी तिकीट द्या, असे तटकरेंनी सांगितल्याचे गीते यांनी यावेळी सांगितले. पण तेही मिळाले नसल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. आता राष्ट्रवादी पक्ष संपत चालला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी गुहागरचे उमेदवार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख संदीप सावंत, आरपीआयचे एम. बंदुकवाले, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे, उद्योजक वसंत उदेग, मोहन आंब्रे, पंचायत समिती उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते.