खेड : जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे चिपळूण, खेड तालुक्यात महापूर तसेच दरड कोसळणे अशा घटना घडलेल्या असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळी भेट दिली. खेड पोलीस ठाणे हद्दीत मौजे अलसुरे गावात अतिवृष्टीमुळे अनेक जणांना स्थलांतरीत केले आहे.
डॉ. गर्ग यांनी अलसुरे गावात भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मौजे पोत्रिक मोहल्ला, खेड या ठिकाणीही भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. खोपी - पिंपळवाडी धरणाला अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला होता. स्थानिक पोलिसांनी महसूल प्रशासनाच्या मदतीने सुरक्षिततेचा उपाय म्हणून शिरगाव, मिरले, बीजघर, कुंभाड, तांबडवाडी येथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले होते. डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी यावेळी स्थानिक पोलिसांना विविध सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.