राजापूर : लॉकडाऊनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प राहिल्याने सर्वसामान्यांसह साऱ्यांचीच आर्थिक कोंडी झाली. या कठीण काळात सर्वसामान्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने लोकांना रोजगाराचा हात दिला. गेल्या तीन महिन्यांमध्ये तालुक्यात या योजनेची पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी अंमलबजावणी होताना विविध प्रकारची सुमारे चारशेहून अधिक कामे झाली. त्यातून ७,२८० दिवसांची मनुष्यदिन निर्मिती होऊन सुमारे २३,०२,९६० रुपयांचा खर्च झाला.
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यातून, त्यांचे अर्थाजन व्हावे यादृष्टीने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गंत मंजुरीसाठी नोंदणी करून जाॅबकार्ड घेणाऱ्या व्यक्तीला नियमित रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. ‘मागेल त्याच्या हाताला काम’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही योजना राबविली जाते. गटविकास अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग यांच्यामार्फत ही योजना राबविली जात आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह साऱ्यांचीच आर्थिक कोंडी झाली. हाताला काम नसल्याने दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून आणि जगायचे कसा असा प्रश्न साऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकला होता. सर्वसामान्यांची ही आर्थिक कोंडी फोडण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्यास मंजुरी दिली होती. त्यातून, लॉकडाऊनच्या काळामध्ये तालुक्यात फळबाग लागवड, विहीर, नॅडेप गांडूळ खत, कंपोस्ट खत, शोषखड्डे खोदणे, आदी विविध प्रकारची सुमारे चारशेहून अधिक कामे करण्यात आली.
-------------------
मनुष्यदिन निर्मिती - ७,२८०
खर्च - २३,०२,९६० रुपये