रत्नागिरीतील भाकर सेवा संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला सहाय्यता कक्ष पीडितांना आधार ठरत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत मोफत उपलब्ध व्हावी यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मदतीने भाकर सेवा संस्थेचा महिला व मुलांसाठी सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. दहा वर्षात १७५० महिलांना त्यांचा संसार वाचवण्याकरिता मदत केली आहे. तसेच महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करून महिला सबलीकरण व समक्षीकरण करण्याचे काम केले आहे.
रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात २०१० मध्ये हा सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला. गेल्या १० वर्षात महिलांकरिता जनजागृतीचे ६५ कार्यक्रम या कक्षामार्फत घेण्यात आले आहेत. या ठिकाणी मिळणारी सेवा ही पूर्णपणे मोफत दिली जाते. महिला सहायता कक्षामध्ये समाजकार्याची पदवी घेतलेले दोन समुपदेशक कार्यरत असतात. कोरोनाच्या काळात देखील हे केंद्र सुरू ठेवून केंद्राचे समुपदेशक पवनकुमार मोरे व अश्विनी मोरे यांनी महिलांकरिता सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्याचे काम केले. तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे परजिल्ह्यातील कामगार व मजुरांकडे जाऊन त्यांना समुपदेशन करण्याचे काम केले आहे. याच कोरोनाच्या काळात भाकर संस्थेने १५० कुटुंबांना पुरेसे अन्नधान्य व १५० कुटुंबांना ‘हायजीन किट’चे वाटप केले.
समाजातील पीडित महिलांना कोणत्याही मदतीसाठी ‘सखी’ वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरशी संपर्क साधावा असे केंद्र प्रशासक अश्विनी मोरे यांनी सांगितले. तसेच ‘सखी’ वन स्टॉप सेंटरच्या बीना खातू, अंकिता चौघुले, लीना बोरीकर, प्राची रसाळ, मोहन पाटील, ॲड. नंदा चौगुले, डॉ. शीतल भोळे, डॉ. भाग्यश्री तानगे आणि पूर्ण टीम ही आपत्कालीन परिस्थितीतही २४ तास पीडित महिलेला मदत करण्यासाठी कार्य करत आहे.
चाैकट
संस्थेने महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने ‘सखी’ वन स्टॉप सेंटर फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरु केले आहे. ही सेवा २४ तास दिली जाते. महिलांवर होणारे अन्याय व त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा याकरिता पीडित महिलेला एका छताखाली समुपदेशन पोलीस, वकील, वैद्यकीय सेवा व तात्पुरती सेवा उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे. या प्रकल्पाची माहिती गावोगावी महिलांपर्यंत पोहाेचावी या करिता ‘सखी’ च्या सर्व कर्मचाऱ्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.