रत्नागिरी : जिल्ह्यात दळणवळणाच्यादृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड (लांजा) ते गावडी, देवडे (संगमेश्वर) ते विशालगड आणि काजिर्डा (राजापूर) ते पडसाळी या तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथमिक सर्वेक्षण करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्त्यांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीला आमदार राजन साळवी, प्रदेश कॉंग्रेसचे राज्य समन्वयक प्रा. विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-कोळेवाडी-मांजरे-गावडी जि. कोल्हापूर, संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे ते विशालगड (जि. कोल्हापूर), राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट या तीन घाट रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्गासाठी भांबेड ते गावडी या घाट रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते आहेत, या घाट रस्त्यांच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासाठी येत्या अर्थंसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे निर्देश देतानाच या तीनही घाट रस्त्यांच्या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून तो खुला करण्याची मागणी यावेळी रत्नागिरी जयगड पोर्ट ट्रान्सपोर्टस युनियनच्या वतीने अध्यक्ष रमेश कीर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे यावेळी केली.
राजापूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेचे सर्वेक्षण करुन आवश्यक जागेची मागणी जिल्हा परिषदेकडून प्राप्त करुन घ्यावी आणि त्यानुसार नवीन जागा पंचायत समिती इमारतीसाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी याप्रसंगी दिल्या.