गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर माशाच्या जाळ्यात अडकलेल्या दुर्मीळ कासवाला जीवदान देण्यात सोमवारी गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांना यश आले.गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींचे मंदिर व संपूर्ण परिसरातील लहान - मोठी हॉटेल्स, लॉजिंग व दुकाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यांवर अथवा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक - भाविकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांची वर्दळ पूर्णत: थांबली आहे. गणपतीपुळे देवस्थान समितीचे कर्मचारी कामानिमित्ताने सेवेत रुजू असल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मंदिर परिसरात फेरफटका मारत असतानाच त्यांना सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान गणपती मंदिराच्या समोरील समुद्रकिनाऱ्यावर अखेरचा घटका मोजत असलेले कासव दिसून आले.यावेळी देवस्थानचे कर्मचारी राकेश सुर्वे, मिथून माने, सागर लिंगायत, अमोल गुरव आदींनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर माशाच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला बाहेर काढुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात सुखरुपपणे सोडले. सुमारे दोन फूट रुंदीचे हे महाकाय कासव गेल्या अनेक दिवसांपासून समुद्राच्या पाण्यात अडकले होते. मासेमारी बंद असल्याने कोणाचे लक्ष गेले नव्हते. तसेच खायला काही मिळत नसल्याने हे कासव मरणावस्थेत येऊन माशाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
माशाच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला गणपतीपुळे येथे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:58 PM
मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका महाकाय कासवाला गणपतीपुळे येथे जीवदान देण्यात आले. स्थानिक तरुणांनी तातडीने धावाधाव केल्यामुळे एक दुर्मीळ कासव बचावले.
ठळक मुद्देमाशाच्या जाळ्यात अडकले होते कासव देवस्थानच्या कर्मचारी, ग्रामस्थांनी केली सुटका