रत्नागिरी : शहरातील मांडवीचे सुपुत्र सुशील सुरेश शिवलकर यांची येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्यपदी पदोन्नतीने (गट अ राजपत्रित अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली आहे. शुक्रवार, दि.५ जानेवारी रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. डाएटच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रचार्यपदी पहिल्यांदाच रत्नागिरीचा सुपुत्र विराजमान झाला आहे.सुशिल शिवलकर यांनी मराठी, हिंदी, इतिहास,राज्यशास्त्र या विषयातून एमए केले. त्यांनंतर एम एड, एम फील केले. पत्रकारितेतील पदविकाही संपादन केली. तसेच रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालय (B.Ed.) येथे इतिहास विषयासाठी मार्गदर्शक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी बी एड वर्गासाठी इतिहास, मराठी या विषयासाठी तर, एम. ए इतिहास व मराठी या विषयासाठी समुपदेशक म्हणून सेवा केली आहे.त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला १९९२ साली रत्नागिरी नगर परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात झाली. २५ जानेवारी २००६ रोजी एमपीएससी परीक्षेद्वारे त्यांची रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अधिव्याखाता (महाराष्ट्रातील शिक्षण सेवा गट ब) या पदावर नियुक्ती झाली. २ फेब्रुवारी २०१३ रोजी पदोन्नतीने याच ठिकाणी वरिष्ठ अधिव्याख्यात (महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ) या पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते.त्यानंतर आता ३ जानेवारी रोजी प्राचार्य (महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग अ राजपत्रित अधिकारी) म्हणून त्यांना रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पदोन्नती मिळाली आहे. शुक्रवारी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सुशिल शिवलकर यापूर्वीही दोनवेळा या संस्थेचे प्रभारी प्राचार्य होते.
आपल्या मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. पण आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यामुळे स्पर्धा परिक्षांबाबत उदासिनता यामुळे यश मिळत नाही. या मुलांनी आत्मविश्वास? परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवले, तर यश नक्की मिळेल. - सुशिल शिवलकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी