चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गोवंश हत्येचा तपास सुरू असतानाच पाच दिवसातच पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात पुन्हा गोवंश हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा केला असून, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नमुने घेतले आहेत.गतवर्षी २६ जानेवारी रोजी खेड - लोटे येथे अशीच घटना घडली होती. या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाच चिपळूण तालुक्यातील कामथे - हरेकरवाडी स्टॉपजवळ पाच दिवसांपूर्वी गोवंश हत्या झाल्याची घटना घडली होती. ज्याठिकाणी हत्या झाली त्याठिकाणी बाजूलाच पावट्याची शेती असून, शेतकरी रवींद्र उदेग हे शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.ही घटना समजताच याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी (२१ जानेवारी) सकाळी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याठिकाणी कापलेल्या जनावरांच्या अवशेषाबरोबरच रक्ताचा सडाही पडलेला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक दोरखंड सापडला असून, हा दोरखंड जप्त करण्यात आला आहे.लोटे, कामथे येथील घटनेनंतर पिंपळी येथे जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, चिपळूण पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.