शोभना कांबळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नये, असा गैरसमज अनेक महिलांमध्ये असल्याने या काळात महिला लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या कालावधीत लस घेतल्यास कुठलाच अपाय होत नसल्याचे स्त्री रोग तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिला, स्तनदा माता यांनी घेऊ नये, अशा मार्गदर्शक सूचना शासनाकडून स्पष्टपणे देण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांमध्ये मासिक पाळीत घेऊ नये, असा उल्लेख नाही. मासिक पाळी सुरू असताना ही घेतली तर कुठलाही अपाय होत नाही. त्याचप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या सुरू असतील, तसेच अन्य कोणता गंभीर त्रास नसेल तर लस घेतली तर तिचा त्रास होत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
गर्भवती महिला, तसेच स्तनदा माता यांना लस दिली जात नाही. कारण गर्भवती महिलांवर लसीच्या चाचण्या न झाल्याने या लसीचा परिणाम त्यांच्यावर कसा होईल हे स्पष्ट न झाल्याने त्यांना लस दिली जात नाही, असे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डाॅ. दिनेश सुतार यांनी सांगितले.
मासिक पाळीच्या वेळी लस घेतली तर कुठलाच अपाय होत नाही. गरोदर स्त्री, स्तनदा माता, १८ वर्षांखालील व्यक्ती, रक्त पातळ हाेण्यासाठी गोळ्या घेत असलेल्या व्यक्ती, रक्त गाेठण्याचे उपचार सुरू असलेल्या व्यक्ती यांनाच लस देता येत नसल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. शुभांगी बेडेकर सांगतात.
गाईडलाईन काय सांगतात
गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेने काेरोना प्रतिबंधक लस घेऊ नये.
पहिला डोस घेतल्यानंतर कुठलाही विपरीत परिणाम जाणवल्यास त्या व्यक्तीला दुसरा डोस देऊ नये.
सध्या जे कोरोनाबाधित झाले आहेत आणि उपचार सुरू आहेत, अशांना ही लस देऊ नये.
१८ वर्षांखालील व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस देऊ नये. त्यावरील वयोगटालाच लस द्यावी.