रत्नागिरी: मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने कोकण किनारपट्टीवरती अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच चेक पोस्टवर तत्काळ बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात २० सागरी पोलीस चौकी आहेत. याठिकाणी देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक गाड्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याच्याशिवाय विविध बंदरांवर असणाऱ्या बोटींची सुद्धा तपासणी केली जात आहे. शहरानजीकच्या पांढर्या समुद्र येथे तीन बोटींची पाहणी व चौकशी पोलीस दल व कस्टम विभागाकडून करण्यात येत होती.
वेंगुर्ला पोलीस “हाय अलर्ट”; किनारपट्टीवर बोटी, गाड्यांची कसून चौकशीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला पोलीस हाय अलर्ट झाले असून ठाण्याच्या हद्दीत सर्व हॉटेल, लॉजिंगची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. वेंगुर्ला हद्दीतील लँडिंग पॉईंट व कोस्टल पॉईंट येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. स्थानिक मच्छीमार, सागर रक्षक दल सदस्य आणि वारडन यांना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल आढळून आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.