रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरी शहरात औषधसाठा घेऊन आलेले संशयास्पद २ टेम्पो प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही टेम्पो शहरातील आठवडा बाजार येथे पकडण्यात आल्याची घटना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली़औषधांचा साठा असलेले २ टेम्पो प्रशासनाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अन्न व औषध प्रशासनाला कळविले़ पोलिसांच्या मदतीने हे दोन्ही टेम्पो आठवडा बाजार येथे अडविण्यात आले़.
त्या टेम्पोंची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये इंजेक्शन आणि औषधसाठा असलेले काही बॉक्स आढळून आले़ त्यानंतर त्यांचा पंचनामा करण्यात आला़ तो साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला़ या औषध साठ्याची अधिक चौकशी जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे़एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळलेला औषधसाठा कोणी मागविला आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. या औषधसाठ्याची मागणी केव्हा करण्यात आली होती याची माहिती घेऊन औषधांचा टेम्पो केव्हा निघाला हेही तपासले जाणार आहे. आठवडा बाजार येथे आढळलेला औषध साठा शासकीय रुग्णालयांसाठी होता की खासगी विक्रीसाठी याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा सापडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.