शिवाजी गोरेदापोली : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली तालुक्यातील हर्णै सुवर्णदुर्ग किल्लाची जागतिक वारसा यादीत नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक दापाेलीत दाखल हाेणार आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला ओळखला जाताे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्याचा समावेश हाेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडून युनेस्काेला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्काेचे एक पथक पाहणीसाठी दापाेलीत दाखल हाेणार आहे. हे पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे.युनेस्कोतील तज्ज्ञ पथकाच्या भेटीमुळे राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी १८ सप्टेंबर राेजी स्वच्छता माेहिमेचेही आयाेजन करण्यात आले आहे. त्याचबराेबर शासनाने किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येथील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला दरम्यान या निधीतून जेटी बांधण्यात येणार आहे.त्याचबराेबर किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर घनकचरा व्यवस्थापन करणे, किल्ल्याच्या परिसरात गवत व मातीचा फरशीचा थर काढून टाकणे, किल्ल्याची दुरुस्ती करणे, तटबंदीची डागडुजी, पदपथाची निर्मिती करणे तसेच इतर कामे केली जाणार आहेत.
चार किल्ल्यांची बांधणीहर्णै येथे १६ व्या शतकात चार किल्ले बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार याच ठिकाणी होते. सुवर्णदुर्ग हा किल्ला पाण्यात असून, या किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाजूलाच भुईकोट, कनकदुर्ग, फत्तेगड असे तीन किल्ले बांधण्यात आले आहेत.