रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा खून करून त्यांना जाळल्यानंतर गडबडीत घमेल्याने राख भरताना त्यातील काही हाडे आणि मांस, दात तिथेच पडले होते. आरोपींची हीच चूक महागात पडली आणि हा खुनाचा कट उघड झाला. घटनास्थळी आढळलेली हाडे व मांस, दात हे स्वप्नाली सावंत यांचेच असल्याचे डीएनए अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी अटकेत असलेल्या पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत याच्या अडचणीत वाढ झाली आहे.सुकांत सावंत तसेच त्याचे साथीदार रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या उर्फ प्रमोद गावणंग यांना या खुनाच्या आराेपाखाली अटक करण्यात आली आहे. स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार सुकांत सावंत याने २ सप्टेंबर २०२२ ला दिली होती. सावंत पती - पत्नीमध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. पती- पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी यांनी ११ सप्टेंबरला दिली. त्यामध्ये सुकांत सावंत, रूपेश सावंत व पम्या गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांतने स्वत: आपल्याला सांगितल्याचे तक्रारीत म्हटले हाेते. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करून पाेलिसांनी तपासाला सुरुवात केली.हा तपास सुरू असतानाच रत्नागिरीतील मिऱ्याबंदर येथे १ सप्टेंबर राेजी सकाळी ११:३० वाजता दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंत यांचा खून करण्यात आला हाेता. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवून रात्री पेंढा आणि पेट्रोलच्या साहाय्याने जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी ती राख समुद्रात टाकल्याची कबुली संशयित मुख्य आरोपी सुकांत सावंत याच्यासह तिघांनी दिली हाेती.वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले. मात्र, पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी सहा ते आठ मानवी हाडे सापडली तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस आणि नंतर एक दातही मिळाला होता. पुरावे नष्ट करण्याच्या गडबडीत केलेली ही चूक सुकांत सावंत आणि त्याच्या साथीदारांच्या अंगाशी आली आहे. मुलीच्या डीएनएबरोबर हा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी पाठवलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए मॅच झाल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाेलिसांच्या केसला मजबुती मिळाली आहे.
स्वप्नाली सावंत खून प्रकरण: पुरावे नष्ट करणेच आरोपीच्या अंगाशी, अन् खुनाचा कट उघड झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 4:09 PM