शोभना कांबळे
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून कोकणात अनेक अघटित घटना घडू लागल्या आहेत. काही वेळा मनुष्याच्या हातून होणाऱ्या चुका तर काही वेळा नैसर्गिक आपत्ती यामुळे घडणाऱ्या या घटनांमध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पावसाळ्यात तर अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान तर कधी बुडून एखाद्याचा मृत्यू अशा घटना दरवर्षीच घडतात. पूर्वी कोकणातला पाऊस म्हटला की, मनात चैतन्य फुलून यायचं. पण आता पाऊस हवाहवासा वाटला तरी त्याचे रूप कसे असेल, हे सांगणे अवघड असल्याने एक वेगळी भीतीही वाटायला लागते.अलिकडच्या काळात तर नैसर्गिक आपत्ती अधिकाधिक रौद्र रूप धारण करू लागल्या आहेत. त्यामुळे त्याचे स्वरूपही काही वेळा भयानक वाटू लागले आहे. मात्र, काही गोष्टींना पावसाळा हे केवळ निमित्त ठरतयं, अस वाटायला लागलय. २ जुलैच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे-भेंदवाडी येथील धरण फुटण्याच्या घटनेने हे प्रकर्षाने जाणवले.
धरण फुटण्याला पाऊस केवळ निमित्तमात्र. त्याचे आगमन या काळात दणक्यातच होते. म्हणूनच त्याच्या आगमनापूर्वी सर्व तयारी करावी लागते. सर्व ठाकठीक करून ठेवावे लागते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच पडलेल्या भगदाडाविषयी या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला सांगूनही प्रशासन निद्रिस्त राहिले आणि त्याची शिक्षा निष्पाप २३ जणांना मिळाली.धरण बांधतांना तिथल्या लोकांना हटविण्यासाठी त्यांना थातूरमातूर आश्वासने देऊन पुनर्वसनच्या नावाखाली ती जागा तशी जबरदस्तीनेच मोकळी केली जाते. मात्र, प्रकल्पग्रस्तांना फारशा काही सुविधा मिळतातच, असे नाही. जिल्ह्यातील गडनदी प्रकल्प, पाचांबे - कुचांबे येथील प्रकल्पग्रस्त वर्षानुवर्षे यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे आता लोकही धरणाच्या बांधकामाला विरोध करतात.
जिल्ह्यातील अनेक धरणांना हा इतिहास आहे. पण आता धरण बांधतांना परिसरातील लोकांच्या सुरक्षेचा विचार केला जातो का, हा प्रश्न आता तिवरे धरण फुटल्याने पुढे आला आहे. हे धरण बांधताना या लोकांनी आपल्या पुनर्वसनाचा प्रस्ताव नाकारला होता. असे असेल तर मग त्यांच्या जीविताचा विचार न करता हे धरण बांधलेच कसे, हा मुख्य प्रश्न उभा राहतो. त्यात जर एवढे मोठे धरण केवळ मातीचेच बांधल्याने पाण्याची किती क्षमता ते पेलू शकेल, हा अभ्यास मृदसंधारण विभागाच्या तज्ज्ञांचा असू नये?ब्रिटिशांच्या काळातील सोडाच पण शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले, बांधकाम अजुनही मजबूत असतानाच दहा - पंधरा वर्षांचे बांधकाम तकलादू निघावे, ही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील शरमेची बाब आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे अलिकडच्या काळातील असली तरीही सध्या धोकादायक झाली आहेत. वृत्तपत्र याबाबत सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, तरीही यंत्रणा निद्रिस्तच आहे.
पाण्यासारखा पैसा खर्च होतो, पण मग बांधकामे इतकी तकलादू का असतात, याचे उत्तर सामान्य माणसाला कधीच मिळत नाही. मात्र, अशा गंभीर घटना घडतात, तेव्हा त्याच बळी जातो तो सामान्यांचा, निष्पापांचा आणि मग सर्वत्र उद्रेक झाला की, त्याचे दायित्वच या यंत्रणा नाकारतात. थातूरमातूर कारणे पुढे करून बचावाचा प्रयत्न करतात. सामान्यांचा आवाज दबलेलाच राहातो. म्हणूनच पुन्हा पुन्हा तिवरेसारख्या घटना घडतात. दोषींना शिक्षा होण्यापेक्षा वाचवण्याचा प्रयत्न राजकारणी मंडळीही करतात.मात्र, तिवरे धरण फुटल्याने अख्खी वाडी पाण्याने वाहून गेली, ही घटना एवढी भयंकर आहे की, आता कुठल्याही गावांमध्ये धरण बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला तरी ग्रामस्थ जीव तोडून त्याला विरोध करणार. या घटनेने धरण फुटण्याची भीती त्यांच्या मनात अधिक गडद होणार आहे.