आॅनलाईन लोकमत
लांजा : तालुक्यातील पालू गावामधील चार वाड्यांना गेले महिनाभर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र, शासकीय यंत्रणेने अद्यापही येथे टँकर उपलब्ध करुन न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी आपल्या सह्यांचे निवेदन लांजा तहसीलदारांना दिले. तसेच टँकर सुरु न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.तालुक्यातील पालू - बौद्धवाडी, नामेवाडी, चिंचुटी - धावडेवाडी, हुबरवणेवाडी या वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. पालू हे गाव डोंंगराळ भागात असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते आणि मार्च ते जून महिन्यापर्यंत येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासते.दिवसेंदिवस गावातील पाणी पातळीमध्ये घट होत असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे करुनही टँकर देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)