लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन परशुराम निवेंडकर हे थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र करण्याची मागणी संचालिका स्मिता पाटणकर यांनी सहकारच्या जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. त्यामुळे निवेंडकर यांचे चेअरमनपदासह संचालकपदही धोक्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रत्येक सदस्याला संधी दिली जात असल्याने २ एप्रिल २०२१ रोजी निवेंडकर यांची त्यांच्या पॅनेलकडून निवड करण्यात आली. निवेंडकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहरातील माळनाका येथील शाखेचे खातेदार आहेत. या शाखेतून घेतलेल्या कर्जाची त्यांनी अद्यापपर्यंत परतफेड केलेली नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार उमेदवार जर संबंधित संस्थेचा अथवा मातृसंस्थेचा थकीत कर्जदार असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते.
कर्जाबाबतची माहिती लपवून ठेवून पतसंस्थेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावरून निवेंडकर यांना लवकरात लवकर दूर करण्याची मागणी पाटणकर यांनी केली आहे. निवेंडकर यांच्या विरोधात कारवाईची मागणी करूनही उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई कधी करणार, याकडे जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व पतसंस्थेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.