कणकवली: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे. कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेली म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या नेत्यांवर अपशब्द व पातळी सोडून टीका करण्यास परत सुरुवात केली आहे. त्याचा भाजपच्यावतीने आम्ही निषेध करतो. राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गट आता माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी करीत आहे. मात्र, या सर्व टीकेच्या प्रकाराची प्रथम सुरुवात कोणी केली? हे त्यांनी तपासण्याची गरज आहे. भाजपच्या नेत्यांवर टीका करायची, मुद्दामहून आरोप करायचे आणि मग प्रसिद्धीच्या झोतात राहायचे अशी संजय राऊत यांची सवय असल्याचा टोला देखील राजन तेली यांनी लगावला.ते म्हणाले, राज्यातले वातावरण बिघडवण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ करावी. अशी मागणी देखील राजन तेली यांनी यावेळी केली.तसेच विनाकारण टीका करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.असेही राजन तेली यावेळी म्हणाले.जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रदेश स्तरावरून निर्णय!राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसाच निर्णय प्रदेशस्तरावर राज्यातील पदांबाबत होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलायचे की त्यांनाही मुदतवाढ द्यायची याबाबतचा निर्णयही प्रदेशस्तरावर होईल असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल तसेच अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका मांडत कणकवली तालुका भाजपच्यावतीने पोलिस ठाण्यावर धडक देत निवेदन सादर केले.