रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपले तरीही मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कारवाईची मागणी
खेड : तालुक्यातील शिरगाव - पिंपळवाडी धरण ८० फुटापर्यंत आटले आहे. मात्र या धरणातून बेकादेशीररित्या अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सरपंच आणि उपसरपंचांनी अवैध वाळू उपसा थांबविण्याबाबत प्रशासनाला कळविले आहे.
रस्ते चिखलमय
रत्नागिरी : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत खणून ठेवण्यात आले आहे. मात्र, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर हा चिखल अधिकच त्रासदायक होऊ लागल्याने दुचाकीस्वारांना त्रासदायक झाले.
मुहूर्त हुकला
रत्नागिरी : गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सर्व सणांवर पसरलेले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षयतृतीयेवर कोरोनाचे सावट कायम होते. त्यामुळे यावर्षीही बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक न मिळाल्याने जुन्या प्रकल्पातील घरे विक्रीविना पडून राहिली. गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीयाही कोरडीच गेली.
घरावरील कौले उडाली
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली या गावालाही चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. या गावातील साईनगर गणपतीच्या देवळाजवळ असलेल्या संतोष सोमण यांच्या घरावरील कौले उडून गेली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर भागांतही अनेक झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुस्तकाचे प्रकाशन
चिपळूण : येथील विनायक केळकर यांनी लिहिलेला नर्मदा परिक्रमाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. नर्मदेची सुमारे ३५०० किलोमीटरची परीक्रमा चार महिन्यांत पूर्ण करून त्यांनी घेतलेले अनुभव या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घरगुती स्वरुपात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुन्हा उकाडा वाढला
रत्नागिरी : चक्रीवादळामुळे शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारी सकाळी ९ वाजल्यानंतर पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील गारवा नाहीसा होऊन उकाड्यात वाढ झाली. त्यानंतर उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली.
सुटकेचा नि:श्वास
राजापूर : रविवारी सकाळी दाखल होणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या भीतीने तालुक्यातील जनता ईश्वराची करूणा भाकत होती. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू लागताच नागरिकांमध्य मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती. मात्र, वादळ पुढे निघून गेल्याने आता सर्व शांत झाले आहे.
थोडासा दिलासा
रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मास्कचा वापर घटला
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तितकी कमी होत नसली तरीही नागरिकांमध्ये मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून येत आहे. अजूनही काही व्यक्ती बाहेर फिरताना विनामास्क फिरत आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असले तरी काहीजण एकही मास्क न वापरता फिरत आहेत.