लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला असून शहरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नगरपरिषदेकडून डास प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात यावी. मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.
डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची होणारी वाढ टाळण्यासारखी असून नागरिकांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी तातडीने डास प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. शहराच्या विविध भागातील ड्रेन लाईनमध्ये पायरेग्रिन व सिट्रोनेला तेलाची फवारणी करणे आवश्यक आहे. शहराच्या विविध भागात विशेषत: ज्या ठिकाणी वृक्ष आणि झुडपाची घनता सर्वाधिक आहे, तसेच बहुतेक नाले उघडे आहेत अशा भागात विस्तृत फवारणी करणे गरजेचे आहे. कमी उत्पन्न असलेली ठिकाणे व झोपडपट्ट्यांचाही विचार होणे आवश्यक आहे.
नागरिकांना डासांच्या नियंत्रणाबद्दल जागरूक करण्यासाठी नगर परिषदेने जनजागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली आहे.