रत्नागिरी : जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. जेडीआरएलच्या मालवाहतूक रेल्वे लाईनच्या कामामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आयोजित बैठकीमध्ये देसाईवाडी - फुणगूस येथे ते बोलत होते.
यावेळी जेडीआरएलचे प्रकल्प समन्वयक राजीव लिमये, अमित चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. एस. के. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सावर्डेकर, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता बी. डी. साळवी, उपअभियंता पाणीपुरवठा बी. आर. शिंदे, प्रकल्प अभियंता पाटणकर, जिल्हा परिषद शाखा अभियंता पी. एस. पोवार, फुणगूसच्या संरपच प्राची भोसले उपस्थित होत्या.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पाला गावाचा विरोध नाही. प्रकल्प झाल्याने येथील गावांचा विकास होणार आहे. परंतु, प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना येत असलेल्या समस्या व अडचणीही दूर करणे गरजेचे आहे. मी राज्याच्या उद्योगमंत्र्याबरोबरच फुणगूसचा ग्रामस्थही आहे, त्यामुळे या प्रकल्पामुळे येथील गावांना निर्माण होणाºया समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द आहे.
पाणीपुरवठ्याविषयी बोलताना देसाई म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांना विहीर व सोबत पाणीयोजना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी पाणीपुरवठा योजना तयार करा की, ज्यामुळे बाधीत गावातील पाण्याच्या प्रश्न कायमाचा सुटेल. भूसंपादनबाबत बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, भूसंपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या दराबाबत आपण स्थानिक आमदारांसोबत सविस्तर चर्चा करु, असे ते म्हणाले.ग्रामस्थ, अधिकाऱ्यांशी केली चर्चा..यावेळी उद्योगमंत्र्यांनी गावातील सहाण तसेच प्रकल्पाच्या कामात अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते, पाणीपुरवठा, भूसंपादन याविषयी निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत गावकरी व अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.रस्ते दुरुस्त करा...प्रकल्पाचे काम करताना सहाणेच्या जमिनीला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब झाले आहेत, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी संबधित यंत्रणेची आहे, असे ते म्हणाले.