रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवाच्या अनुषंगाने काढलेल्या नियमावलीत थोडा बदल केला असून, त्यानुसार आता सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य असल्याचे या शुद्धीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सवाच्या अनुषंगाने ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेश निर्गमित केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिमगोत्सवाकरिता मुंबई-पुण्यावरून नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरोग्यविषयक चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावणे, सजविणे, बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद केले होते.
२५ ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्राम कृती दल यांनी घ्यावी. होळी व पालखीची पूजा, नवस, हार, नारळ आदी स्वरूपात स्वीकारु नयेत तसेच प्रसाद वाटपही करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून पालखी घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी शुद्धिपत्रक काढून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती आरोग्यविषयक चाचणी करून घेणे आवश्यक राहील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.