गुहागर : गुहागर शहराचे तलाठी गजानन महादेव धावडे (वय ५७) यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. सातबारा उताऱ्यावर नावांची नोंद घालण्यासाठी त्याने लाच मागितली होती.याबाबत लाचलुचपत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची गुहागर तालुक्यात वडिलोपार्जित सामायिक जमीन आहे. वडिलांच्या निधनानंतर या जमिनीच्या सातबारामध्ये तक्रारदार यांच्या इतर नातेवाईकांची नावे लागलेली होती. परंतु तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची नावे अद्याप सातबारामध्ये लागली नव्हती. ही नावे दाखल करण्याकरिता तक्रारदार यांनी तलाठी गजानन धावडे यांची भेट घेतली. त्यावेळी धावडे यांनी त्यांना त्यांच्या इतर नातेवाईकांची संमतीपत्रे व तक्रारदार यांना अर्ज आणण्यास सांगून हे काम करून देण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी केली. १२ मे रोजी पंचांसमक्ष या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये तक्रारदाराने तलाठ्यांना लाच देण्याचे ठरवण्यात आले. ही रक्कम शनिवारी दुपारी १२.५८ वाजता तलाठी सजा गुहागर कार्यालयात स्वीकारल्यानंतर पंचासमक्ष तलाठी धावडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरी विभागाकडून पोलिस उपअधीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे, सहायक पोलिस फौजदार गौतम कदम, बाळासाहेब जाधवर, संतोष कोळेकर, प्रकाश सुतार, प्रवीण वीर, नंदकिशोर भागवत, योगेश हुंबरे, आदी पथकाने केली.
पंधरा हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत
By admin | Published: May 15, 2016 12:27 AM