रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी (वय ३३ वर्षे ) याला ४५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. ही कारवाई गुरूवार, (दि. २२) रोजी करण्यात आली.अश्विन नंदगवळी याने १ जून रोजी तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून चिपळूणच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता या कार्यालयातील कर्मचारी यांच्यासाठी ४० हजार रूपये व वेगळा सातबारा देण्याकरिता मंडळ अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रूपये असे एकूण ४५ हजार रूपयांची लाच मागितली.याअनुषंगाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि नंदगवळी याने पिंपळी खुर्द येथील तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष लाच स्वीकारल्यानंतर पंचांसमक्ष त्याला रंगेहात पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रविण ताटे, हेड काॅन्स्टेबल संतोष कोळेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर आणि प्रशांत कांबळे (चालक) यांचा या पथकात समावेश होता. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे आणि अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.
पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ हजारांची लाच घेताना सापळ्यात, रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई
By शोभना कांबळे | Published: June 22, 2023 3:18 PM