गुहागर : शिवसेनेच्या जीवावर राजकीय कारकीर्द सुरु केली आणि आज दुसऱ्या पक्षात जाऊन गमजा मारीत आहेत. त्यांची निष्क्रीयता गुहागरमधील सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आली असून, लवकरच त्याची प्रचिती येईल. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदाराने गेल्या दहा वर्षात गुहागरचा किती विकास केला, ह्याचे संशोधन करावे लागेल, अशा परखड शब्दात शिवसेना संपर्कप्रमुख विजय कदम यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला.रामपूर व मालदोली जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा जाहीर मेळावा मार्गताम्हाने येथील शिर्के सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे औचित्य साधून रामपूर गटातील नऊ गावांमधील भाजप, मनसे, राष्ट्रवादीच्या चारशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना व त्यांना शुभेच्छा देताना कदम म्हणाले की, गुहागरमधील भाजप व राष्ट्रवादीने तालुक्यातील जनतेचा, मतदारांचा केवळ स्वार्थाकरिताच वापर केला. अनेक वर्षे ह्या मतदारसंघातील माय-भगिनींना पाण्याकरिता वणवण करावी लागते, यासारखी उपेक्षा कोणती असावी. भाजप आणि राष्ट्रवादीने रखडवून ठेवलेली अनेक कामे शिवसेनेने हाती घेतली आणि आता ती पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यात पुन्हा गावागावात भगवा फडकू लागला आहे. लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच व राज्याचा मुख्यमंत्री सेनेचा असेल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, अमोल कीर्तीकर यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)प्रवेशकर्त्यांचे रोप देऊन स्वागतउमरोली, कात्रोळी, शिरवली, गोंधळे, मार्गताम्हाने, देवखेरकी, नारदखेरकी आदी गावांमधील राष्ट्रवादी, भाजप, मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांना संपर्कप्रमुख कदम यांनी हापूस आंब्याचे कलमी रोप व पुष्प देऊन स्वागत केले.
आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे तालुका उपेक्षित
By admin | Published: March 16, 2016 8:25 AM