शिवाजी गोरे -- दापोली --कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होऊनसुद्धा नियोजनाअभावी पावसाचे पडणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन होत नसल्यानेच जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसत आहे. गतवर्षी दापोली तालुक्यात ६ गावांमध्ये १४ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली होती. त्यावेळी एका टॅँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यावर्षी १२ गावांमध्ये २२ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, २ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.दापोली तालुक्यातील काही गावातील वाड्या अजूनही तहानलेल्या आहेत. उन्हाळ्यात या वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली की, यावर तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु टँकरने मिळणाऱ्या पाण्यावर किती वर्षे तहान भागवणार? या वाडी - वस्त्यांची कायमची तहान भागवण्यासाठी पाण्याचा सोर्स उपलब्ध होणे गरजेचे आहे. पाणीटंचाईच्या वाड्यांचे भीषण वास्तव नीमूटपणे सहन केले जात आहे.देवाचा डोंगर भागातील धनगरवड्या तहानलेल्या आहेत. देवाच्या डोंगरावरील धनगरवाड्यांना जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा बसू लागतात. पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देवाच्या डोंगरावरील पाणी टंचाईसाठी विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्याही कोरड्या पडतात. विहिरींचे पाणी वाढवण्यासाठी व पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. उन्हाळ्यात देवाच्या डोंगरावरील विहिरी कोरड्या पडतात व लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरु होते. देवाच्या डोंगरावर लाखो रुपये खर्च करून विहिरींचे काम करण्यात आले आहे. परंतु देवाच्या डोंगरावरील लोकांची तहान मात्र कायमस्वरुपी भागताना दिसत नाही. दापोली तालुक्यातील देवाचा डोंगर, उटंबर, केळशी, लाडघर, आसूद, फरारे, उन्हवरे, आगारी या गावांतील काही वाड्या तहानलेल्या आहेत. फरारे मोगेरवाडी, भोईवाडी या भागातील लोकांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. एका बाजुला खाडी व दुसऱ्या बाजूला डोंगर उतार अशा दोन्हींच्या मध्यभागी फरारे गाव वसले आहे. दापोलीतील किनारीपट्टी व समुद्र किनाऱ्यावरील फरारे, आगारी, दाभोळ, उन्हवरे, उटंबर, पाजपंढरी, केळशी, भाटी समुद्र व खाडी किनाऱ्यावरील गावांना पाणीटंचाईची सर्वांत जास्त झळ बसू लागली आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गोड्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे खाडी किनारपट्टीवरील गावांना आजही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दापोली तालुका पाणीटंचाई आराखडा शासनाकडून तयार केला आहे. टंचाई आराखड्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन टँकरचा वापर सुरु आहे. परंतु पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दोन टँकरने पाणी टंचाईग्रस्त गावांची तहान भागवताना तारेवरची कसरत करावी लागते. एक दिवसआड पाणीपुरवठादापोली नगरपंचायतीकडून सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजून पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा नारगोली धरणात असून, यंदादेखील गेल्या दोन वर्षांप्रमाणे टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येणार नसल्याचे नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी सांगितले.शहराला कोडजाई नळपाणी पुरवठा योजना आणि नारगोली येथून पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. कोडजाई नदीवर अद्याप पाणीस्रोत उपलब्ध असल्याने येथील पाणीस्रोत आटल्यानंतर नारगोली धरणावर दापोलीकरांचा भार पडणार आहे. मात्र, नारगोली धरणात अद्याप पंधरवडाभर पुरेल त्यापेक्षा अधिक पाणी आहे. यामुळे गेल्या दोन वर्षात टँकरने पाणीपुरवठ्याची करण्याची वेळ आली नव्हती. तशीच यंदादेखील टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नसल्याचे चित्र आहे. नारगोली धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यानंतर मात्र दापोलीकरांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत विचार करता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पाण्यासाठी तहानलेल्यांना टँकरचा आधार
By admin | Published: May 07, 2016 12:14 AM