खेड : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. ग्रामीण भागातील दुर्गम आणि डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सद्य:स्थितीत पंचायत समितीच्या माध्यमातून एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरने पाच गावांतील सात टंचाईग्रस्त वाड्यांना पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यातील खवटी खालची व वरची धनगरवाडी, आंबवली भिंगारा, सवणस मुळगाव, खोपी रामजीवाडी व तुळशी कुबजई या टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांचा समावेश आहे. यावर्षी जिल्ह्यातील पहिला टँकर खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये २ एप्रिल रोजी धावला होता. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. खवटी खालची धनगरवाडी हे खेड तालुक्याचे शेवटचे टोक आहे. या गावात दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. यंदा गतवर्षीपेक्षा १८ दिवस उशिरा खवटी खालची धनगरवाडी येथे पहिला टँकर धावला होता. तीव्र उन्हाच्या झळा वाढल्यानंतर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.