पोचरी देण गावामध्ये अभियान
देवरुख : माझी रत्नागिरी, माझी जबाबदारीअंतर्गत आरोग्य तपासणी अभियानाला संगमेश्वर तालुक्यातील पोचरी देण गावामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सरपंच सुनील धामणे आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक प्रकाश मुंडे, तलाठी, आरोग्य सेविका, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी आदिंनी मेहनत घेतली.
ग्रामस्थ भीतीच्या छायेत
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी सुंदरवाडी घरकुल वसाहत येथील घरालगतच गेलेल्या विद्युतलाईनचे लोखंडी पोल पूर्णपणे गंजलेले आहेत. त्यामुळे या वस्तीवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.
लस घेण्यासाठी लोक ताटकळत
चिपळूण : खेर्डी गावातील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस उपलब्ध व्हावी व खेर्डी येथे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पिंपळी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी लोकांना ताटकळत राहावे लागते.
महागाईमुळे लोक त्रस्त
राजापूर : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव व महागाई यामुळे ग्रामीण व शहरी भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे वाढते दर, कडधान्य, डाळींच्या दरातील वाढ, इंधन दरवाढ यामुळे दरमहा आर्थिक गणित जुळविणे अवघड झाले आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.
बॉण्डपेपरची टंचाई
रत्नागिरी : शहरात बॉण्डपेपर विक्रेत्यांचा परवाना अद्याप नूतनीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे बॉण्डपेपर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून बॉण्डपेपरची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
विक्रेत्यांचे मास्क लावण्याकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच काही भाजीविक्रेते, फळविक्रेते, हातगाडीवाले मास्क वापरत नसल्याने धोकादायक ठरू शकतात. त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.