राजापूर : तौक्ते वादळामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्या गावातील नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. तेथील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने लांजा आणि संगमेश्वर येथून प्रत्येकी एकेक असे दोन शासकीय टँकर आणून काही गावांना मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरू केला आहे.
तौक्ते वादळाचा जोरदार तडाखा तालुक्यातील महावितरणला बसला आहे. तालुक्याच्या पश्चिम परिसरात तर वादळाने वितरण विभागाचे मोठे नुकसान केले आहे. त्या परिसरातील अनेक गावातील नळपाणी योजना विद्युत पुरवठा बंद असल्याने ठप्प झाल्या आहेत. पाणी पुरवठा न झाल्याने त्या गावातील लोक त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी होत असलेली वाढती मागणी पाहून तालुका प्रशासनाने लांजा व संगमेश्वर येथून प्रत्येकी एक एक असे दोन शासकीय टँकर मागवले असून, प्रशासनाच्या सुचनेनुसार बुधवारी अणसुरे, जैतापूर, दळे व माडबन या गावांसाठी टँकर पाठवण्यात आले. उर्वरित गावांनाही टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. अजून काही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने त्याची दखल घेताना आणखी एखादा टँकर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विद्युत वितरणचे कर्मचारी जोमाने काम करीत असून, तुटलेल्या तारा व पडलेले विद्युत खांब उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामध्येही अडचणी येत असल्या तरी पुढील एक दोन दिवसात तालुक्याच्या पश्चिम भागातील खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण विभाग झटत आहे.