रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. आज दुपारपर्यंत नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचवणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले.
मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली होती. नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. आज सकाळी ते रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून रत्नागिरी तालुक्यातील तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास सुरुवात केली. नाणीज गावातील पाहणी दरम्यान तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच गौरव संसारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सामंत यांनी खानू ग्रामपंचायतीला भेट देऊन नुकसानाबद्दल आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, तहसीलदार, सरपंच गणेश सुवारे उपस्थित होते. पाली पाथरट, माईन वाडी या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, विभाग प्रमुख तात्या सावंत, माझी सरपंच संदीप गराटे, प्रांत, तहसीलदार व उपस्थित होते. कापडगाव येथेही भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी सरपंच विघ्नेश विश्वास कोत्रे उपस्थित होते.