राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तत्काळ शिक्षकांना ‘पोलीस मित्र’ म्हणून नियुक्ती देण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर निर्बंध घालण्याचे काम शिक्षकांनी केले. विशेष म्हणजे घाटांमध्ये असणाऱ्या चेकनाक्यावर रात्रपाळीची ड्युटी देखील शिक्षकांना करावी लागली. यावेळी शिक्षक आपल्या पदाचा विचार न करता, पोलीस शिपायांबरोबर दिवसभर रस्त्यावर उभे होते.
घरोघरी पोषण आहाराचे वितरण
विद्यार्थ्यांमध्ये कोराेनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शाळांमधील शिल्लक पोषण आहाराच्या वितरणाचा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी शालेय शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर पोषण आहार वितरणाचा निर्णय घेण्यात यावा, असे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांना वाडी-वस्तीवर जाऊन पोषण आहार पालकांकडे वितरित करावा लागला. यावेळी काही वाड्यांमध्ये शिक्षकांना प्रवेशही मिळाला नाही. पण आपली जबाबदारी या नात्याने शिक्षक सातत्याने हे काम करत राहिले.
रेशन दुकानावर नियुक्ती
शाळेतील पोषण आहार वितरण करून होतो न होतो तोच, शिक्षकांची गावातील रेशन दुकानांवर नियुक्ती करण्यात आली. धान्य वितरणादरम्यान रेशन दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली. वाडी-वस्तीतून येणाऱ्या लोकांमध्ये शिस्त निर्माण करण्याची व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर राखून रेशन वितरित करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले. रेशन वितरणादरम्यान लोकांमध्ये झालेल्या अनेक भांडणतंट्यांनाही शिक्षकांना सामोरे जावे लागले. गुरुजनांचा समाजातील दर्जा लक्षात न घेता, रेशन दुकानावर काम करण्याची सक्ती प्रशासनाकडून शिक्षकांवर करण्यात आली व शिक्षकांनी ते कामही आपली जबाबदारी म्हणून स्वीकारले.
कोरोना काळातही बोर्डाचे काम वेळेत पूर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट असतानाही शिक्षकांनी जबाबदारीने व वेळेत केलेल्या कामामुळेच मंडळ जाहीर करू शकले, असे वक्तव्य तत्कालीन राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले होते. या काळामध्ये कोणीही घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात होती. अशा काळातही शिक्षकांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून निकालाचे काम पूर्ण केले. राज्यातील अनेक शाळा कन्टेन्मेंट झोनमध्ये असतानाही राज्यातील नऊही विभागीय मंडळांचा निकाल राज्य मंडळाला वेळेत पूर्ण करता आला. यामुळेच लाखो विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे गुणपत्रक मिळू शकले. कोकण विभागीय शिक्षण मंडळ यावर्षीही राज्यात अव्वल आले होते. विशेष म्हणजे शालेय निकालही लॉकडाऊन कालावधीमध्येच संचारबंदी असतानाही शाळेत जाऊन शिक्षकांनी पूर्ण केला होता.