वाटूळ : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नियमित ५०० पेक्षा जास्त कोविडचे रुग्ण सापडत आहेत़ त्याचा संसर्ग अनेक प्राथमिक, माध्यमिक शिक्षक कर्मचारी व त्यांच्या कुंटुबीयांना होत आहे़ काहींना तर आपला जीवही गमवावा लागला आहे़ या कठीण काळात शिक्षक पतपेढ्यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केली आहे़
प्रसार माध्यमांशी बाेलताना आनंद त्रिपाठी यांनी सांगितले की, जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या पतपेढ्या कोट्यवधींचा नफा असणाऱ्या आहेत़ तसेच प्राथमिक पतपेढीची रत्नागिरीतील आरोग्यमंदिर येथे तर माध्यमिक शिक्षक पतपेढीची साळवी स्टाॅप येथे इमारत आहे आजच्या या गंभीर परिस्थितीत शिक्षक व त्यांचा कुटुंबीय तसेच समाजाच्या मदतीसाठी या पतपेढीने आपल्या इमारती व नफा वापरून शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे़ कोविड सेंटर उभारून ऑक्सिजनसह डाॅक्टर यांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाला मदत केली पाहिजे़ प्राथमिक व माध्यमिक पतपेढ्यांच्या संचालक मंडळांनी आपला लाखो रुपयांचा नफा जमिनी, इमारती यात गुंतवणूक करण्याऐवजी आपल्या सभासदांचे जीव वाचविण्यासाठी उपयोगी आणावा़ सभासद वाचले तरच पतपेढ्या वाचतील, असे मत त्रिपाठी यांनी व्यक्त केले़