सागर पाटील
टेंभ्ये : राज्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी राज्य शासनाने ह्यपवित्र पोर्टलह्ण ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये जाहिरात अपलोड करण्यासाठी शाळांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत आहे. यामुळे शिक्षक भरती म्हणजे ह्यभीक नको पण कुत्रं आवरह्ण अशी अवस्था शाळांची झाली आहे. शिक्षक अनुशेषासंदर्भात वारंवार शासन स्तरावरून प्रसिध्द होणाऱ्या शुद्धीपत्रकांमुळे शिक्षक भरती ही केवळ कागदावरच होणार असल्याची चर्चा होत आहे.माध्यमिक शाळांमध्ये जवळपास २०१२पासून शिक्षक भरती बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यासाठी राज्य शासनाने पवित्र पोर्टल नावाची संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये जाहिरात अपलोड करण्यासाठी शाळांना अनुशेष तपासून घेणे आवश्यक आहे. कोकण विभागातील शाळांची अनुशेष तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक विभागासाठी पूर्णवेळ शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अपुरे कर्मचारी व अतिरिक्त कार्यभार असणाºया अधिकाऱ्यांमुळे अनुशेष तपासण्यासाठी विलंब होत आहे. सहाय्यक आयुक्त (मावक), कोकण भवन यांच्याकडून अनुशेष तपासून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त कार्यालयात शिक्षणाधिकारी कार्यालयाने तपासून दिलेल्या अनुशेषामध्येही मोठ्या प्रमाणात त्रुटी काढल्या जातात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी नवीन त्रुटी काढली जाते. यामुळे काही शाळांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी रत्नागिरीतून कोकण भवनच्या दहा-दहा फेऱ्या माराव्या लागल्याचे अनेक मुख्याध्यापकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शासनस्तरावरुन सातत्याने बिंदूनामावली दुरुस्ती करणारी शुद्धीपत्रके प्रसिद्ध केली जात आहेत. यामुळे प्रत्येक शाळेला जवळपास तीनवेळा अनुशेष तपासून घ्यावा लागला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सवर्ण आरक्षणाचा अद्याप बिंदूनामावलीमध्ये समावेश नसल्याने पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून अनुशेष तपासून आणावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रक्रियेमुळे कोकण भवनच्या फेºया मारून थकलेल्या मुख्याध्यापकांना शिक्षक भरतीची भीक नको पण कोकण भवनच्या फेºया आवर, असं म्हणण्याची वेळ आली आहे. शासनस्तरावरून सातत्याने शुद्धीपत्रके प्रसिध्द केली जात असल्याने शिक्षक भरती केवळ नावापुरतीच नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.आमच्या माध्यमिक शाळेमध्ये गेली चार वर्षे सहा वर्ग व पाच शिक्षक कार्यरत आहेत. दोन शिक्षकपदे रिक्त असतानादेखील शासनस्तरावरून भरतीसाठी परवानगी दिली जात नाही. अनुशेष तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी व सहाय्यक आयुक्त, कोकण भवन यांच्या कार्यालयाला अनेक फेऱ्या मारून झाल्या आहेत.
गेले तीन दिवस जाहिरात अपलोड करण्यासाठी अनेक मुख्याध्यापक हे शिक्षणाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत थांबून आहेत; परंतु अद्याप जाहिरात अपलोड करण्याची टॅब सुरू झाली नसल्याचे सांगितले जात आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या तोंडावर चाललेला हा खेळखंडोबा कधी थांबणार? असा प्रश्न पडला आहे. शिक्षक भरती करावयाची असेल तर शाळांची ससेहोलपट थांबवून ती तत्काळ करावी.- विलास कोळेकर,मुख्याध्यापक, दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे, रत्नागिरी.