लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे शासनाने ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५५ टक्के ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. मात्र नेटवर्क समस्या असलेल्या गावात मात्र दूरदर्शन, आकाशवाणी तसेच स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करून ४५ टक्के शाळांमध्ये ऑफलाइन अध्यापन सुरू आहे.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून ५० टक्केचा निकष आहे. शिक्षक ऑनलाइन अध्यापन शाळेसह, घरातून करीत आहेत. नेटवर्क समस्या असणाऱ्या गावात शाळेत शिक्षक जात असले तरी मुलांना प्रत्यक्ष भेटत नाहीत. मात्र पालकांच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका मुलांना वितरित करण्यात आल्या असून दररोजचा अभ्यास स्वाध्याय पुस्तिकेव्दारे सोडवून घेण्यात येत आहेत. शिवाय दर आठवड्याला मुलांनी केलेला अभ्यास तपासून देत आहेत. काही ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने बाधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. शिवाय काही शाळेतून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या गावात शिक्षक जाणे टाळत असून घरातूनच ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. शिवाय मुलांच्या पालकांकडे मोबाइल नसल्यास शेजारील ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हाॅटस्पाॅट अभ्यास पाठविला जात आहे.
नेटवर्क नसलेल्या गावातून गतवर्षीप्रमाणे ग्रामस्थांच्या सहकार्याने आठवड्यातून तीन, चार वेळा प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मात्र याबाबत ग्रामस्थ, पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
गतवर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी यासाठी शासनाने सेतू अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून ४५ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक मोबाइलवर पीडीएफ फाइल पाठवित असून दररोज मुले वहीवर अभ्यास लिहून काढत आहेत. ऑफलाइनच्या मुलांना झेरॉक्स काढून शिक्षकांनी दिल्या आहेत. ऑनलाइनमध्ये मुले प्रत्यक्ष समोर नाहीत, ऑफलाइनमध्ये मुले स्वत: अभ्यास करीत आहेत. त्यामुळे मुलांना आकलन होत आहे अथवा नाही, जो भाग समजला नाही, त्याबाबत मुले मागे राहत आहेत. गणित, विज्ञानसारख्या विषयात मुले मागे पडत आहेत.
-----------------------------
ऑनलाइन अध्यापनास प्रारंभ झाला असला तरी मुलांना आता त्याचा सराव झाला आहे. शासनाच्या सूचनेनुसार सध्या ब्रीज कोर्सच्या माध्यमातून मुलांची उजळणी सुरू आहे. गतवर्षातील अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात येत आहे. ऑफलाइन अध्यापनात स्वाध्याय पुस्तिकाव्दारे दैनंदिन अभ्यास घेण्यात येत असून, दर आठवड्याला मुलांनी केलेला अभ्यास तपासून दिला जात आहे.
- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ