रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव बीटच्या शिक्षकवृंदाने आज शहरात पथनाट्यातून स्वच्छतेविषयी जोगवा, फुगडी आदी लोककलांमधून जनजागृती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी विविध स्तरावरून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिरगाव केंद्रातर्फे आज शहरातील तीन ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आली. पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या आयोजनाखाली मुख्य बसस्थानक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे पथनाट्य सादर झाले. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे पथनाट्य सादर करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारे गीत, जोगवा, फुगडी आदी लोकनृत्ये यावेळी सादर झाली. स्वच्छता गीताने या पथनाट्याची सांगता झाली. या पथनाट्यात शिरगाव बीटमधील शिक्षिका उज्ज्वला धामणकर, वृंदा सावंत, प्रेरणा जाधव, रूचिरा सावंत, सुनेत्रा चिपळूणकर, रजनीगंधा वाघमारे, मंजिरी सरदेसाई, रेवती वैद्य यांचा सहभाग होता. यासाठी मूळ संकल्पना, लेखन, दिग्दर्शन सड्येच्या केंद्रीय प्रमुख मयुरी जोशी यांचे होते. कार्यक्रमाला साथसंगत पद्मनाभ जोशी, प्रदीप करंबेळेकर, दीपक कदम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, महसूल विभागाच्या तहसीलदार प्रियांका कांबळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी शिरगाव बीटच्या शिक्षकवृंदांनी जोगवा सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला.
शिक्षिकांनी मागितला स्वच्छतेचा जोगवा
By admin | Published: November 12, 2014 9:10 PM