रत्नागिरी : संचमान्यतेबाबत शनिवारपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास हजारो शिक्षक सोमवारपासून राज्यभर रास्ता रोको करतील, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरणाऱ्या २०१३-१४ च्या संचमान्यता तत्काळ रद्द करा. अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांना संरक्षण द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष रमेश जाधव व कार्यवाह एस. एस. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संचमान्यतेमुळे राज्यात घोळ निर्माण झाला असून, अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याबाबतीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे. संचमान्यतेच्या त्रूटी दूर करुन नव्याने निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन माध्यमिक विभाग व प्राथमिक विभागाला देण्यात आले.जिल्ह्यातील शेकडो अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांच्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंदोलनादरम्यान शिक्षणाधिकारी व उपजिल्हाधिकारी दोन्हीजण उपस्थित नव्हते. प्राथमिक विभागाच्यावतीने भारती संसारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तालुका कार्यवाह महेंद्र कुवळेकर, उपाध्यक्ष कदम, प्रभाकर धोत्रे, संगमेश्वरचे अध्यक्ष अरुण सप्रे, राजापूरचे अध्यक्ष राजन नाईक, कार्यवाह अरुण कुराडे, प्रवक्ते आनंद त्रिपाठी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवणाऱ्या संचमान्यतेविरोधात गुरुवारी शिक्षक परिषदेने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
शिक्षक परिषदेचे धरण
By admin | Published: November 20, 2014 10:47 PM