वाटूळ : शासनाने शिक्षकांना सुटी जाहीर करूनही रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभागाने मात्र अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. मे महिना सुरू हाेऊन आठ दिवस झाले तरी शिक्षणाधिकारी यांनी अद्यापही उन्हाळी सुट्टीसंदर्भात शाळांना सूचना दिलेली नसल्याचे म्हटले आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते साेमवारी सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. शिक्षक परिषदेच्या या भूमिकेला शिक्षण क्रांती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनीही पाठिंबा दिला आहे़
तसेच पंचायत समितीकडून ड्युटी लावण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. काही शिक्षकांना ६ तास तर काहींना १२ तास काम करावे लागत आहे. बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या ड्युटीसाठी फक्त शिक्षकांनाच ड्युटी लावली जात आहे. पंढरपुरातील ड्युटीवर असणाऱ्या शिक्षकांसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्यास याबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल, हे विचारण्यासाठी शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. ऑनलाईन तास, परीक्षा, पेपर तपासणी, निकाल, पुढील वर्षाचे नियोजन या कामांमध्ये सुट्टी जाहीर झाली असली तरी शिक्षक काम करतोच आहे. यासाठी सुट्टी कालावधीतील ड्युटीची परिवर्तित रजा मिळण्याबाबत विचार करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव पी. एम. पाटील, कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केली आहे.