रत्नागिरी : शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब, रत्नागिरीतर्फे तालुक्यातील सहा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच दहावीतील ५३ विद्यार्थ्यांसाठी ‘आयडीएल स्टडी ॲप’चे वितरण करण्यात आले. हा कार्यक़्रम शहरानजिकच्या खेडशी येथील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय पवार, सचिव जयेश काळोखे, राजेंद्र घाग, दिलीप रेडकर, राजेंद्र काळे, विनायक हातखंबकर, सचिन सारोळकर तसेच संस्थेचे प्रताप सावंतदेसाई, मुख्याध्यापक देसाई, सुभाष पाटील व इतर शिक्षक तसेच लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे गौरी विजय करमरकर (जिल्हा परिषद शाळा, कारवांचीवाडी), रेवती विजय वैद्य (जिल्हा परिषद शाळा, बसणी), मानसी नितीन मोने (जिल्हा परिषद शाळा, वेतोशी), अपूर्वा जयेश काळोखे (केंद्र शाळा, डावखोल), महेंद्र शांताराम शिंदे (महालक्ष्मी विद्यालय, खेडशी) आणि ज्योती उदय डोंगरे (जिल्हा परिषद शाळा, कासारवेली) या शिक्षकांना रोटरी क्लबतर्फे प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्ष विजय पवार यांनी रोटरी क्लबच्या या ॲपबाबत माहिती दिली. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त करताना अनेक दानशूर व्यक्तींनी यासाठी क्लबला सहकार्य करावे, असे आवाहन केले. केंद्रप्रमुख अमर घाडगे यांनी शिक्षकांप्रति रोटरी क्लब करत असलेल्या कार्याला त्रिवार सलाम करत येणाऱ्या कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण सारे कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.
प्रताप सावंतदेसाई यांनी शिक्षकांप्रति रोटरी क्लबचे योगदान अनमोल आहे, हे सांगताना शिक्षकांचे काम अधिक प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्कारमूर्ती ज्योती डोंगरे आणि गौरी करमरकर यांनी रोटरी क्लबबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुरस्कारामुळे काम करायला अधिक बळ मिळते, असे विचार व्यक्त केले. आपल्या गुरुस्थानी असलेल्या शिक्षकांना वंदन करत विनम्रतापूर्वक पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकारी यांचेही आभार मानले.
सुभाष पाटील व महेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सचिन सारोळकर यांनी दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. शिक्षकांचा सन्मान करण्याचे कार्य यापुढील काळातही केले जाईल, याची ग्वाही दिली. आयडियल स्टडी ॲपचे वितरण तालुक्यातील बहुतांशी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना करण्याबाबत रोटरी क्लब कटिबद्ध असेल, असेही सारोळकर यांनी सांगितले. सचिव जयेश काळोखे यांनी यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रतापराव सावंतदेसाई यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या आयडीयल स्टडी ॲपच्या खर्चाचा भार स्वीकारल्याबद्दल रोटरी क्लबने त्यांना धन्यवाद दिले. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.