रत्नागिरी : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सुमारे दोन हजार शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी विराट आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. भरपावसात शिक्षकांनी माेर्चात सहभागी हाेत जाेरदार घाेषणाबाजी केली.शहरातील माळनाका येथून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शिक्षकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जाेरदार काेसळणाऱ्या पावसातच हातात छत्र्या घेऊन, रेनकोट घालून शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.या मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेला शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा, दि. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, शिक्षणसेवक पद रद्द करा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करा,राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शैक्षणिक, अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेक विविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहिस्थ संस्थांच्या परीक्षा ऑनलाइन माहिती, माहितीची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबविण्यात यावीत, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
वाहतुकीवर परिणामशहरातील माळनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला होता. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हजारो शिक्षकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला असला, तरी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.